क्वारटाईनमध्येही शाळेविषयी कृतज्ञता.......
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील अनेक चाकरमानी कोकणात दाखल झाले. चाकरमान्यांनी कोकणात यावे की न यावे याबाबत स्थानिकांमध्ये अनेक मतमतांतरे होती. सरतेशेवटी चाकरमानी कोकणात दाखल झाले. या चाकरमान्यांना स्थानिक प्राथमिक शाळा, हायस्कूल यामध्ये सध्या क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. परंतु क्वारटाईन कालावधीत या चाकरमान्यांनी आदर्शवत उपक्रम राबवले आहेत. एप्रिल, मे महिना शाळा बंद असण्याचा कालावधी. त्यामुळे नेहमीप्रमाणे शाळेत मुलांची रेलचेल नाही. परंतु चाकरमान्यांनानी क्वारंटाईन कालावधीत शाळांची साफसफाई करण्याचे महत्वपूर्ण काम केले. मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर, वायंगणी हायस्कूल या शाळेत क्वारंटाईन असणाऱ्या चाकरमानी व माजी विद्यार्थ्यांनी शाळांची स्वच्छता केली. शाळेच्या सभोवतालचा परिसर पूर्ण स्वच्छ केला. शाळेच्या परिसरात असलेल्या झाडांची देखभालही चाकरमान्यांनी केली आहे. झाडांना अळी करुन त्यांना पाणी देत वृक्षसंवर्धनाचा संदेशही दिला आहे. मसुरे देऊळवाडा भरतगड येथील क्वारटाईन असलेल्या तरुणांनी शाळेच्या साफसफाईबरोबर शाळेची रंगरंगोटी देखील केली. यामधील अनेक चाकरमानी हे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. सर्वांनी आदर्शवत उपक्रम राबवून शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा