कोल्हापूरला पोस्टाची परिक्षा आटोपून एसटीत बसलो होतो. एवढ्यात किरणच्या अपघाताची बातमी सोशल मिडीयावर आली. किरणच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. वाडीतील माणसे, मित्रपरिवार, लोकप्रतिनिधी यांनी धावपळ करुन किरणला जिल्हा रुग्णालय, पडवे, गोवा बांबुळी येथे उपचारासाठी नेले. परंतु उपचारादरम्यान किरणचे निधन झाले. आज दुपारी बातमी एडीट करत असताना वडाचापाटमधला सारा भूतकाळ गर्जत डोळ्यासमोर उभा राहिला. लहानपणी उन्हाळी सुट्टीत आम्ही गावी वडाचापाटला जात असू. आम्ही घरी गेल्यावर किरण आमच्या घरी आवर्जून येत असे. कधीही किरण्या हि हाक मारल्यावर किरण्या आमच्या घरी हजर असायचा. लहानपणी क्रिकेट खेळताना किरण हा हक्काचा साथीदार असायचा. नदीत पोहायला जाणे, ढाकळीच्या खाली झोके घेणे, कुंभ्यात क्रिकेट खेळणे, झाडावरचे कच्चे आ़ंबे काढून मीठ, मसाला लावून खाणे या साऱ्या गोष्टींचा आनंद मी किरण सोबत लुटला आहे. किरणच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पण किरण कधीही दु:खी दिसला नाही. परिस्थितीवर मात करुन तो जीवन जगत होता. साधारण दोन वर्षांपूर्वी किरण आमच्या घरी लग्नाच निमंत्रण देण्यासाठी आला होता. सगळ्यांनी येवक ...