काल रात्री घरी येताना मोहसीन भेटला. त्याने मला थांबवून बातमी दिली, आपले बी.डी. बनसोडे सर गेले. मी क्षणभर स्तब्ध झालो. पी. के.चौकेकर, सिद्धार्थ जाधव यांच्याशी संपर्क साधून सरांच्या निधनाबद्दल विचारले. दुर्दैवाने सरांच्या निधनाची बातमी खरी होती. लहानपणापासून ज्या सरांच्या सानिध्यात वाढलो, मोठे झालो त्या बनसोडे सरांच्या अचानक जाण्याने धक्का बसला. आम्ही चाचींकडे भाड्याने राहत असताना सरही तेथेचे भाड्याने रहायचे. त्यामुळे लहानपणापासून सरांविषयी मनामध्ये भिती होती. परंतु जसजस सरांबद्दल जाणून घेत गेलो तसतशी सरांबद्दलची भिती कमी होत गेली. मी पहिलीत असल्यापासून सरांना नेहमी सामाजिक कार्यक्रमात पहायचो. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये तथागत बुद्ध, म. फुले, राजर्षी शाहू महाराज, डाँ. आंबेडकर जयंतीनिमित्त सरांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन व्हायचे. सर तथागत बुद्ध, म. फुले, रा. शाहू, डाँ. आंबेडकर यांच्या साहित्याचे अभ्यासक होते. प्रबोधनाच्या कार्यक्रमात सरांचे भाषण नेहमीच अभ्यासपूर्ण असायचे. हतिहासाच्या सनावळ्या, हतिहासाचे संदर्भ, घटनाक्रम याची इत्यंभूत माहिती सरांच्या वक्तूत्वातून मिळायची. सामाजिक...