पावसाळा अन् आमची शाळा.......
गेले महिनाभर उष्णतेच्या लाटेने सर्वांना हैराण केले होते. त्यामुळे गारव्यासाठी प्रत्येक जण मेघराजाची वाट पाहत होते.काल सकाळी किनारपट्टीवर मात्र पावसाळी वातावरण दिसत होते. मालवणात सकाळी जरासा पाऊस पडला. पण त्यानंतर वातावरणात एक गारवा पसरला. रविवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. अन् तप्त झालेल्या धरणीला शांत करुन गेले. आज वातावरणात सगळीकडे गारवा पसरला आहे. क्षणभरासाठी मिलिंद इंगळेंच्या गारवा अल्बमधील गीतांची आठवण झाली. पाऊस सुरु झाल्याने अनेकांची छत्री, रेनकोट, गाडीचे कव्हर या वस्तू शोधण्याची लगबग सुरु झाली असेल. पाऊस आणि शाळा हे समीकरण ठरलेले आहे. भंडारी हायस्कूलमध्ये आम्ही मोठा पाऊस झाला की नेहमी उत्साहित असायचो. विचार विशेषतः देवबाग, घुमडे येथील मुले आनंदीत असायची. अशातच पावसाचा जोर वाढला की शिपाई मामांचे वर्गात आगमन व्हायचे. शिपाई मामांचे आगमन म्हणजे शाळा सोडून देणार हे जवळजवळ निश्चित असायचे. त्यामुळे आम्ही सर्व साहित्य गोळा करुन वर्गाच्या बाहेर पडण्याच्या तयारीत असायचो. अखेर मुख्याध्यापकांची सूचना आली की शाळेला सुट्टी मिळायची. पावसाळ्याच्या कालावधीत दप्तरात वह्या ठेवणे कौशल्याचे काम असायचे. काही जण वह्या, पुस्तके भिजू नयेत यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांत गुंडाळून ठेवायचे. शाळेतल्या वर्गामध्ये रेनकोट व छत्र्या ठेवण्याची आमची जागा ठरलेली असायची. रेनकोट खिडक्यांना आणि छत्र्या मागच्या बाजुला सुकत ठेवल्या जायच्या. छत्र्या वर्गात पुढच्या बाजूला ठेवल्या तर शिक्षकांचा ओरडा खावा लागायचा. वर्षाची सुरुवात बहुतांश पावसाच्या निबंधाने व्हायची. वर्गातील ठराविक मुले सोडली तर बाकीच्या मुलांचे निबंध थोडे फार सारखेच असायचे. त्यामुळे पावसाळा आणि शाळा या आठवणी न विसरता येण्यासारख्या आहेत. संग्राम कासले.मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा