आठवणीतील शिक्षिका......
30 जून रोजी भंडारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस. एस. टिकम, भंडारी हायस्कूलच्या शिक्षिका सौ. जे. जे. फर्नांडिस या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या . जय गणेश इंग्लिश मिडियमच्या मुख्याध्यापिका सौ. मेघना जोशी यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. या तीनही शिक्षकांचे मला वैयक्तिक जीवनात तसेच पत्रकारिता, समाजप्रबोधन यासाठी बहुमुल्य सहकार्य लाभले आहे. मी सुरुवात करतो फर्नांडिस मँडम यांच्यापासून. फर्नांडिस मँडम ह्या आमच्या पाचवी ब च्या वर्गशिक्षिका होत्या. त्यांच्या कडक शिस्तीत आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. फर्नांडिस मँडम अतिशय कडक असल्या तरी त्या अतिशय प्रेमळ व मनमिळावू आहेत. पाचवी ब मधील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. कोणी वाईट संगतीत जावू नये याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. आम्ही अभ्यासाव्यतिरिक्त मस्ती करताना दिसलो की, कासले, गावकर बाबांका सांगतलय मस्ती करतास ते' हा फर्नांडिस मँडमचा पेटंट डायलाँग असायचा. मँडमविषयी आमच्या मनात आदरयुक्त भिती असायची अन् अजूनही आहे. पाचवीत असताना आमच्या शाळेची सहल आंबोलीला गेली होती. माझ्या घरी आर्थिक समस्या असल्याने मला सहलीचे पैसे भरणे शक्य नव्हते. अशावेळी फर्नांडिस मँडमनी माझे सहलीचे पैसे भरले होते. ते पैसे त्यांनी माझ्याकडून कधीही परत घेतले नाहीत. परंतु मुलीच्या निधनानंतर मला फर्नांडिस मँडम मनाने खचलेल्या दिसल्या. शाळेत गेल्यावर फर्नांडिस मँडम यांना हाक मारली नाही तर, पाठीमागून काय रे मेल्या इसालरस काय? हा डायलाँग नक्की ऐकू येतो. भंडारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. टिकम या 30 जून रोजी नियत वयोमनानुसार सेवानिवृत्त झाल्या. पत्रकार म्हणून काम करताना टिकम मँडम यांच्याशी अनेक वेळा भेट व्हायची. मँडम आवर्जून भंडारी हायस्कूलमध्ये होणारे उपक्रम यांची नेहमी माहिती द्यायच्या. दै. तरुण भारतचे स्काँलरशिप मित्र तसेच समताप्रबोधनाचे कार्यक्रम राबवताना टिकम मँडम यांचे नेहमीच सहकार्य लाभायचे. भंडारी हायस्कूल माजी विद्यार्थी युवा संघटनेच्या निमित्ताने मी, महेंद्र, भूषम टिकम मँडमची सातत्याने भेट घ्यायचो. त्यावेळी आम्हाला त्यांचे सहकार्य लाभायचे. जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मेघना जोशी यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये समताप्रबोधनाचे उपक्रम राबवताना मेघना जोशी मँडम यांचे सातत्याने सहकार्य लाभले. जय गणेश इंग्लिश स्कूलमध्ये जोशी मँडम यांनी मुख्याध्यापक पदाच्या कालावधीत विविध उपक्रम राबविले. परंतु त्यांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवणारा उपक्रम अतिशय स्तुत्यपणे राबविला होता. हा उपक्रम राबविताना त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गनिहाय प्राजेक्ट दिले होते. (उदा. चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह ) यामुळे सर्व विद्यार्थ्यांना डाँ. आंबेडकर यांच्या कार्याची माहिती मिळाली. या तीनही सावित्रीच्या लेकींना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा!
(संग्राम कासले, मालवण)

आठवणी ताज्या झाल्या संग्राम..
उत्तर द्याहटवा