जग बदल घालूनी घाव.........
जग बदल घालूनी घाव सांगून गेले मजला भीमराव. असे म्हणत प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड करणारे, कष्टकरी, श्रमिकांच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 आँगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. अण्णाभाऊसाठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊ साठे यांचे बालपण अतिशय गरीबी व दारिद्यात गेले. अण्णाभाऊ साठे केवळ दिड दिवस शाळेत गेले. साधारणतः अकरा ते बारा वर्षाचे असताना अण्णा आपल्या आई वडीलांसमवेत मुंबईला आले. परंतु मुंबईला आल्यावर अण्णांच्या जीवनात फारसा बदल झाला नाही. मुंबईत अण्णाभाऊ मिळेत ते काम करु लागले. मुंबई भायखळा येथे अण्णांनी मजूर, कष्टकरी यांच्या व्यथा जवळून पाहिल्या. या कालावधीत अण्णांवर कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव पडला. या काळात अण्णाभाऊंनी विविध पोवाडे रचले. कामगार चळवळीशी त्यांचा निकटचा संबंध आल्याने कामगारांचे प्रश्न त्यांनी जवळून अनुभवले. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या साहित्य उमटत होते. अण्णांनी साहित्य लेखनात कष्टकरी, श्रमिक व सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी होता. कथा, कादंबरी, पोवाडे, लावण्या, प्रवासवर्णन आदि साहित्य प्रकारांचे अण्णांनी लेखन केले. माक्सवादाप्रमाणेच अण्णांवर आंबेडकरवादाचाही प्रभाव होता. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित जातीव्यवस्थेविरूद्ध बंड केले होते. म्हणून तर आंबेडकरवादाने प्रभावित झालेले अण्णाभाऊ एके ठिकाणी म्हणतात, जग बदल घालूनी घाव। सांगून गेले मला भीमराव। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर अण्णांनी रचलेली मैना या लावणीला रसिकांनी भरभरून दाद दिली. अण्णाभाऊ साठे यांनी विपुल लेखन केले आहे. आपल्याला जर कष्टकरी, श्रमिक, दिनदलितांचे प्रश्न समजून घ्यायचे असतील तर अण्णाभाऊ साठेंच्या समग्र साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे. - संग्राम कासले, मालवण
(संदर्भ - विद्रोही कलावंत अण्णाभाऊ साठे, लेखक - डाँ. राजेश्वर दूडूकनाळे)

अण्णा भाऊंच कार्य सगळ्यांना प्रेरणा देऊन जातं
उत्तर द्याहटवा