15 ऑगस्ट रोजी सायंकाळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे सोशल मिडीयावर पोस्ट करून जाहिर केले. धोनीने मै पल दो पल का शायर हूँ! या गीताच्या साथीने निवृत्तीची पोस्ट शेअर केली. धोनीची क्रिकेट कारकिर्द प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. रांची या गावातून आलेल्या धोनीने संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 2007 टी 20 वल्ड कप, 2011 चा 50 षटकांचा वल्ड कप, 2013 ची चॅम्पियन ट्रॉफी आदि विजेतेपद भारताने धोनीच्या नेतृत्त्वाखाली प्राप्त केली आहेत. शांत, संयमी धोनी भारतीय संघासाठी मार्गदर्शक राहिला आहे. स्टँपच्या पाठीमागे उभा राहून संपूर्ण सामन्याची सूत्रे फिरवणारा धोनी क्रिडा रसिकांच्या कायम लक्षात राहणार आहे. 2004 मध्ये आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या धोनीने हेअर स्टाईलने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. धोनीचा हॅलिकॉप्टर शॉटही अनेकांच्या पसंतीस उतरला होता. त्याचबरोबर त्याची अफलातून स्टँपिंग करण्याची स्टाईलही दिर्घकाळ स्मरणात राहणार आहे. यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना धोनीने आपले पाय नेहमीच जमिनीवर ठेवले. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील माणसे धोनीला आपला आदर्श मानतात. धोनीने निवृत्ती जाहिर करताना मै पल दो पल का शायर हूँ! हे गीत शेअर केले. या गीताचा अन्वयार्थ सर्वांना लागू पडणार आहे. जीवन हे आपल्याला मिळालेली एक संधी आहे. या जीवनात आपण जगून घ्यायचे. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा. धोनी जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगला आणि इतरांनाही त्याने आनंदाने जगण्याचा सल्ला दिला आहे. धोनीने निवृत्ती जाहिर केली असली तरी चेन्नई सुपर किंग्जच्या माध्यमातून आयपीएलमध्ये दिसणार आहे. कॅप्टन कुल धोनीच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा!
संग्राम कासले (मालवण)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा