वाचाल तर वाचाल असे एक सुवचन आहे. या सुवचनाने मला लहानपणापासून प्रेरित केले. पहिली ते पाचवी या कालावधीत मी जास्तकरुन गोष्टींची पुस्तके वाचली. सहावीपासून मी भंडारी हायस्कूलच्या ग्रंथालयात जाऊ लागलो. ग्रंथालयात मला वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके वाचायला मिळाली. सहावी ते दहावी या कालावधीत मी एकांकिका, पर्यावरण, विज्ञान या विषयावरची पुस्तके वाचली. अकरावी व बारावीत मी अनेक महनीय व्यक्तींची चरित्रे अभ्यासली. त्याचबरोबर ऐतिहासिक विषयांवरील पुस्तकांचा अभ्यास केला. दोन वर्षात मी मृत्युंजय, राधेय, कौंतेय, राजा शिवछत्रपती, शुद्र पूर्वी कोण होते? आदि पुस्तके वाचली. या कालावधीत मी लोकमत या वृत्तपत्राचे सातत्याने वाचन करायचो. या वृत्तपत्रातील स्पर्धा परीक्षेसाठीची कात्रणे गोळा करुन मी त्याची एक वही बनवली होती. स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसातच मी दै. रत्नागिरी टाईम्स या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करू लागलो. काँलेजच्या तीन वर्षांत माझे दैनंदिन वृत्तपत्रांचे वाचन वाढले. पण मी जिल्ह्यातील वृत्तपत्रे वाचन करत होतो. वृत्तपत्र वाचनाबरोबर अनेक मराठी कादंबऱ्यांचेही मी वाचन केले. वि.वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, नारायण धारप, वि. दा. करंदीकर, चि.त्र्यं.खानोलकर, बाबुराव बागुल, ह. मो. मराठे या लेखकांच्या पुस्तकांचे वाचन केले. काँलेजनंतर देवगडला बी.एडला असताना बी.एडच्या पुस्तकांव्यतीरिक्त फारसे वाचन झाले नाही. बीएडनंतर मळेवाड हायस्कूला असताना निबंधाच्या अनुषंगाने भरपूर अवांतर वाचन केले. या वाचनाचा उपयोग मला मराठी निबंधलेखन या पुस्तकाचे लेखन करताना झाला. समतादूत प्रकल्पाच्या निमित्ताने रायगडला असताना दत्ता गायकवाड या मित्रामुळे मला स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचण्याची आवड लागली. वर्षभरात दत्तामुळे मी स्पर्धा परीक्षेची भरपूर पुस्तके वाचली. समतादूत प्रकल्पात मला विविध विषयाची पुस्तके वाचायला मिळाली. समतादूत प्रकल्प प्रशिक्षणात आम्हाला समाजसुधारक, विचारवंत, वैज्ञानिक यांची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली होती. या पुस्तकांमुळे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची जवळून ओळख झाली. रायगडला असताना सकाळी लोकसत्ता पेपर मला लवकर वाचायला मिळायचा. वर्षभर लोकसत्ता मी सातत्याने वाचला. मालवणला दै. तरुण भारतमध्ये आल्यावर पुन्हा जिल्ह्यातील वृत्तपत्रांचे माझे वाचन सुरू झाले. सध्या ई पेपरच्या माध्यमातून विविध वृत्तपत्रांचे वाचन सुरु असते. राज्यात विविध ठिकाणी फिरत असताना मला शक्य होतील तेवढी पुस्तके मी खरेदी केली. या पुस्तकांसाठी खास एक कपाट खरेदी केले. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी कपाटातील पुस्तके वाचत असतो. पुस्तक वाचनाने तुमची एक विचारधारा बनण्यास मदत होते. माझीही तशीच विचारधारा बनली आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मुल्ये माझी विचारधारा आहेत. या मूल्यांचा प्रसार करणे हे मी माझे कर्तव्य मानतो. तुम्हा सर्वांनाच माझे ग्रंथालय प्रत्यक्ष पाहता येणे शक्य नाही. त्यामुळे माझ्या ग्रंथलयाची माहिती देणारी युट्युबची लिंक मी शेअर करत आहे. ती अवश्य पहा. https://youtu.be/ucsQt6vrtTU
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा