भंडारी हायस्कूलमध्ये मी तिसऱ्या इयत्तेत प्रवेश घेतला. तिसरी ते बारावी पर्यंतचे माझे शिक्षण भंडारी हायस्कूलमध्ये झाले. या दहा वर्षात मला व माझ्या असंख्य मित्रांना भंडारी हायस्कूलने बरच काही दिल आहे. म्हणूनच आम्ही अभिमानाने भंडारी हायस्कूलचे विद्यार्थी असे सांगतो. भंडारी हायस्कूलने मला आयुष्यभर साथ देणारे असंख्य मित्र मैत्रीण दिल्या. हा मित्र मैत्रीणींचा ग्रुप एवढा प्रचंड आहे की त्याची यादी तयार करण्यासाठी एक स्वतंत्र ब्लाँग तयार करावा लागेल. मी किंवा माझे मित्र, मैत्रीण अडचणीत असू हा ग्रुप आमच्या मदतीला नेहमीच तयार असतो. भंडारी हायस्कूलने आम्हाला जीवनाचे महत्व शिकवणारे अनेक शिक्षक दिले. यामधील अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत तर काही शिक्षक आजही कार्यरत आहे. भंडारी हायस्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षिका कडक शिस्तीचे होते पण तेवढेच प्रेमळ होते. या शिक्षकांनी आम्हाला अभ्यास तर शिकवला पण त्याचबरोबरीने आमच्यातील कलागुणांनाही वाव दिला. भंडारी हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन, क्रिडा स्पर्धा, प्रजासत्ताकदिनी बोर्डींग ग्राऊंड, टोपीवाला हायस्कूल मैदानावर होणारे कार्यक्रम हा माझा व माझ्यासह असंख्य मित्रमैत्रिणींचा आवडता विषय असयाचा. तिसरी ते बारावी हा कालावधीत दरवर्षी आम्ही मित्रमैत्रिणींनी प्रत्येक स्नेहसंमेलनात भाग घेतलेला आहे. स्नेहसंमेलनाच्या तयारीसाठी शेवटचे दोन तास, शनिवार, रविवार असा आमचा दिनक्रम असायचा. प्रजासत्ताक दिनी बोर्डींग ग्राऊंड, टोपीवाला हायस्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आम्ही आघाडीवर असायचो. या सर्व कार्यक्रमात सर्व शिक्षकांचे आम्हाला प्रोत्साहन असायचे. पण सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा झाले की अभ्यासाला सुरुवात करा असेही सर्व शिक्षक आवर्जून सांगायचे. शाळेशी असलेले माझे व माझ्या मित्रांचे ऋणानुबंध अजूनही कायम आहेत. 26 जानेवारी व 15 आँगस्ट या दोन राष्ट्रीय सणांदिवशी मी आर्वजून शाळेत जातो. शिक्षकांची भेट घेतो. शाळेत फिरुन जुन्या आठवणींना उजाळा देतो. तुमच्या प्रत्येकाच्या शाळेशी संबंधित अशाच काहीशा आठवणी असतील. काही दिवसांपूर्वी मी युट्युबवर स्वांतत्र्यदिनी मालवणला फेरफटका असा व्लाँग तयार केला होता. त्यामध्ये भंडारी हायस्कूलशी संबंधित आठवणी शेअर केल्या आहेत. तो व्लाँग अवश्य पहा. त्या व्लाँगची युट्यूब लिंक शेअर करीत आहे. https://youtu.be/q1Kb3swM4hM
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा