आठवी ते दहावी या कालावधीत सामंत सर आम्हाला भंडारी हायस्कूलमध्ये गणित हा विषय शिकवायचे. गणित हा विषय माझा नावडता विषय. आजही गणिते सोडवताना मला तणाव येतो. परंतु सामंत सरांच्या शिकवणीच्या पद्धतीमुळे गणित, भूमिती विषयाची थोडीफार आवड निर्माण झाली होती. तीन वर्षात सामंत सरांची वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये पाहता आली. सामंत सरांचे अक्षर अतिशय सुंदर आहे. सामंत सरांची स्टायलिश सही वहीवर घेण्यासाठी आम्ही सर्व मित्र मैत्रिणी भंडारी हायस्कूलच्या स्टाफरुममध्ये रांगा लावत असू. कितीही गर्दी असली तरी सामंत सर प्रत्येकाची गणिताची वही तपासून काळ्या जेल पेनने सही करत असत. सामंत सर वर्गात येतानाच एक अनोखा उत्साह घेऊन वर्गात येत असत. सरांना वर्गात खुर्चीवर बसलेले आम्ही पाहिले नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बेंचकडे जाऊन गणिते समजावणे हे सरांचे वैशिष्ट्य. सर वर्गात फळ्यावर गणित सोडवून पूर्ण फळा भरुन टाकत. सरांची फळ्यावर गणिते सोडविण्याची पद्धत, फलकलेखन यामुळे सरांची मुलांमध्ये वेगळीच क्रेझ होती. नववीत असताना आम्ही सर्व मित्र रविवारी गणिते सोडविण्यासाठी सायकलने देवबाग येथील सामंत सरांच्या घरी गेलो होतो. सकाळी आम्ही 9 वाजण्याच्या सुमारास सायकलने सामंत सरांच्या घरी पोहचलो. त्यावेळी सर घरी नव्हते ते कोणत्या तरी कामानिमित्त बाहेर गेले होते. परंतु सरांनी आईकडे निरोप देऊन ठेवला होता मी येईपर्यंत मुलांना गणिते सोडविण्यास सांगणे. त्यावेळेस हंगामा चित्रपट आला होतो. सरांच्या घरी असलेल्या टीव्हीवरही रविवारी तो चित्रपट लागला होता. परंतु तो चित्रपट पाहण्याचे आमचे धाडस झाले नाही. पण आमचे परममित्र टायटस फर्नांडिस यांनी चित्रपट लावण्याचे धाडस केले. आम्ही लपून छपून हंगामा चित्रपट थोडाफार पाहिला. तेवढ्यात सामंत सरांची आई घरातून बाहेर आली, सरांका सांगतलय तुम्ही अभ्यास सोडून पिक्चर बघतास ते? त्यानंर आम्ही टीव्ही बंद करुन गणिते सोडवू लागलो. परंतु आमचे लक्ष हंगामा पिक्चरकडेच अधिक होते. बऱ्याच अवधीनंतर सामंत सर आले. त्यांना आम्ही गणिते सोडवताना दिसलो. आम्ही केलेला प्रताप सरांना समजला असेल की नाही हे अजूनही आम्हाला समजले नव्हते. सर भंडारी हायस्कूलमधून सेवानिवृत्त झाले आहेत, पण सेवानिवृत्त झाल्यासारखे वाटत नाहीत. सरांच्या घरी गेलात तर सर त्यांचा वाडा तुम्हाला फिरवून दाखवतील. राजकारण, समाजकारण, शैक्षणिक आदि बाबींवर सर मनसोक्त बोलतात. मुलांना शैक्षणिक मदत करणे, मुलांची आर्थिक परिस्थिती समजून स्वतःच्या ओमनीतून शालेय मुलांना देवबागहून शाळेत आणणे यासाठी सर आमच्या मनात आहेत. सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा