देशात एखादी घटना घडल्यानंतर आपण विशिष्ट विचाराच्या चष्म्यातून त्या घटनेकडे बघतो. त्या घटनेला त्याच विचारात बांधतो. परंतु आता हे बदलण्याची गरज आहे. समाजात घडलेल्या घटनांना संविधानाच्या दृष्टीकोनातून बघायला हवे. त्यामुळे संविधानाने आपल्याला काय दिले हे समजेल. संविधान सोप्या पद्धतीने समजावून सांगितले तर देशातील नागरिक ते समजावून घेतील. त्यामुळे संविधान समजावून देण्यासाठी समाजातील नागरिकांशी संवाद साधूया असे आवाहन लोकराजा राजर्षी शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे सचिव राजवैभव शोभा रामचंद्र यांनी येथे केले.
बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, बार्टी समतादूत, फुले शाहू आंबेडकर विचारमंच मालवण यांच्यावतीने बॅ. नाथ पै सेवांगण येथे संविधान समजून घेण्यासाठी संविधान संवाद या एकदिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅङ देवदत्त परूळेकर, फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष आनंद मालवणकर, सचिव संजय जाधव, अमोल पाटील, स्नेहल माळी, संग्राम कासले, संजय आचरेकर, संजय वराडकर आदि उपस्थित होते.
श्री. परूळेकर म्हणाले, भारतीय संविधान व त्यामधील तरतुदी या देशातील नागरिकांना समजून सांगणे गरजेचे आहे. परंतु संविधानातील तरतुदी जशाच्या तशा सांगितल्या गेल्या त्या नागरिकांना समजणे कठीण आहे. त्यामुळे त्या सोप्या शब्दात सांगणे आवश्यक आहे. राजर्षी शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे संविधान संवाद व त्यांची टिम अतिशय चांगल्या पद्धतीने संविधान समजावून सांगत आहे. संविधान संवादाचे हे कार्यक्रम शाळा, महाविद्यालय या ठिकाणी होणे आवश्यक आहे.
संविधान कार्यशाळेमध्ये राजवैभव व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थीना विविध उपक्रम दिले. त्याचबरोबर संविधानाशी संबधित स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना पुस्तक रूपाने पारितोषिके देण्यात आली. गट चर्चेद्वारे संविधान सभेची माहिती देण्यात आली. यावेळी रंजन तांबे, दर्शना गुळवे, विजय चौकेकर, व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजचे विद्यार्थी अर्जुन गावडे, बाजीराव कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बॅ. नाथ पै सेवांगणच्या कर्मचारी वृंदाचे सहकार्य केले. सुत्रसंचालन संजय आचरेकर यांनी केले. संग्राम कासले यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा