स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वृत्तपत्रांचे वाचन अतिशय महत्वाचे असते. कारण वृत्तपत्रामधुन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, कला, क्रिडा तसेच इतर घटकांविषयी माहिती उपलब्ध होत असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी रोज वृत्तपत्राचे वाचन करावे असे प्रतिपादन जि. प. चे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पोलीस पाटील पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.
मामा वरेरकर नाटयगृह येथे मालवण तालुक्यात पोलीस पाटील पदाच्या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या मालवण तालुक्यातील उमेदवारांसाठी ओबीसी व आरक्षित महासंघाच्यावतीने मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पराडकर हे बोलत होते.
याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष नितीन वाळके, चौके उपसरपंच पी. के. चौकेकर, संग्राम कासले आदि उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र पराडकर म्हणाले, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जिल्हयाच्या इतिहास, भुगोल, महत्वाच्या व्यक्तींची पदे आदिंची माहिती असणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर जिल्हयामध्ये होणा-या महत्वाच्या घटनांची नोंद असणे आवश्यक आहे. ग्रामपंयायत ते लोकसभेबद्दलची सर्व माहिती विद्यार्थ्याला असणे आवश्यक आहे. सध्या सोशल माध्यमांद्वारे ही माहिती उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग स्पर्धा परीक्षेसाठी करावा. पोलीस पाटील भरतीच्या पश्नपत्रिकेत आतापर्यंत आलेल्या प्रश्नांचा अभ्यास करावा जेणेकरुन प्रश्पत्रिका सोडवताना अडचणी येणार नाहीत. यावेळी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, महासंघाचे अध्यक्ष नितीन वाळके, चौके उपसरपंच पी. के. चौकेकर, संग्राम कासले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार संग्राम कासले यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा