*तरुणांचा धम्म चळवळीत सहभाग*
मे व जून महिन्यात कट्टा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बौद्धाचार्य श्रामनेर प्रशिक्षण शिबिर पार पडले. त्याची परीक्षा 27 ऑक्टोबर 2024 रोजी कणकवली येथे संपन्न झाली. या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थिमध्ये मी, सचिन कासले, मनोज काळसेकर 34 वयाच्या दरम्यान होतो. बाकी बहुतांश 50 वयाच्या पुढचे होते. एकूणच ही सर्व परिस्थिती पाहता तरुण धम्म चळवळीकडे मोठ्या प्रमाणात वळताना का दिसत नाही याचे विचार मंथन होणे गरजेचे आहे.
या संदर्भात मी टीव्हीवर नामदेव ढसाळ यांची एक मुलाखत पाहिली होती त्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात की जे मूल बौद्ध परिवारात जन्मते त्यांना लहानपणापासूनच घरात तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो दिसतात. हे फोटो पाहूनच ही मुले लहानाची मोठी होतात. त्यामुळे ज्या महामानवांनी या देशात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य केले. त्यांचे कार्य पुढे चालवणे ही त्या बौद्ध घरातील कुटुंबातील प्रत्येकाचे एक कर्तव्यच असते. प्रत्येकाने ते कार्य केलेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. ही जाणीव प्रत्येक बौद्ध पालकाने आपल्या मुलांमध्ये रुजवली पाहिजे तरच आपली मुले धम्म चळवळीकडे येतील.
याच अनुषंगाने आणखी एका मुद्द्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. नुकतीच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणची नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. ही कार्यकारणी निवडताना संजय पेंडुरकर, सूर्यकांत कदम, रविकांत कदम यांनी माझ्यासारख्या अनेक तरुणांना प्रोत्साहित करून कार्यकारणी संधी दिली. त्यासाठी अनेक प्रकारे त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच भारतीय बौद्ध महासभेच्या मालवण तालुका शाखेच्या कार्यकारणीत अनेक नवीन चेहरे दिसत आहेत.
धम्म चळवळ हा वारसा प्रत्येकाला आपल्या घरातून व समाजातून मिळत असतो. मला हा वारसा माझे आजोबा, वडील त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून मिळाला आहे. त्यामुळेच मी या धम्म चळवळीत येऊ शकलो. आज हाच वैचारिक वारसा प्रत्येक बौद्ध समाजातील वडीलधारी माणसे, कार्यकर्ते यांनी आजच्या तरुणांना देणे गरजेचे आहे. तरुणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जयंती बुद्ध पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिन अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करणे गरजेचे आहे व हे प्रबोधनातून शक्य आहे. एखादा तरुण बेकार असू दे किंवा सरकारी नोकरीला असू दे, किंवा व्यवसाय करत असू दे, वर्षातून चार ते पाच दिवस तो कार्यक्रमांना निश्चित उपस्थित राहू शकतो. व या कार्यक्रमातूनच त्याच्या जीवनाला एक चांगल्या पद्धतीची दिशा मिळू शकते. एकदा तरुणाला धम्माची गोडी लागली तर तो आपसूक धम्म चळवळकडे वळणार आहे. पण त्यासाठी तरुणांना सक्तीने नाही तर आपुलकीने, प्रेमाने, प्रबोधनाने या धम्म चळवळीकडे वळवणे गरजेचे आहे.
*आयु. संग्राम सतीश कासले*
*M.A, B.Ed, MSW, MCJ, LLB*
(*लेखक, शिक्षक, पत्रकार, समुपदेशक, तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे प्रचार व पर्यटन विभागाचे सचिव आहेत*)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा