*सामाजिक न्यायाचे जनक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. विविध विषय अभ्यासले, हाताळले. आपल्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे त्यांनी वंचित, उपेक्षित समूहाला तर माणसात आणण्याचं काम केलाच;शिवाय या देशातील सर्व लोकांना समान दर्जा,समान संधी,समान न्याय कसा मिळेल या साठी काम केलं, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तर आहेतच, त्याचबरोबर ते खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे शिल्पकार व सामाजिक न्यायाचे जनक आहेत. हा त्यांचा पैलू मानवी जीवनाच्या परिवर्तनामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांना घटनात्मक अधिष्ठान दिले. जे आरक्षण, मूलभूत अधिकार सामाजिक व शैक्षणिक सोयी या पासून वंचित आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करून त्यांनी या शोषित, वंचित, पिडित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं महान कार्य केलं. आजही सामाजिक न्यायाच्या प्रत्येक चळवळीचा पाया बाबासाहेबांच्या विचारावर आधारित आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जात, धर्म, लिंग, आर्थिक स्थिती व सामाजिक स्तरावरील असमानतेला समता, बंधुता, न्याय या त्रिसूत्रात बांधले. त्यामुळेच आज अनेकांना सामाजिक न्याय मिळतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशातील १४० कोटी जनतेवर अनंत उपकार आहेत.त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक नागरिकाला सक्षम बनविण्याचं काम केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्षे ११ महिने १८ दिवस अत्यंत मेहनत करून जगातील अतिशय चांगली भारतीय राज्यघटना या देशाला दिली.आज भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सव साजरा झाला. या राज्यघटनेच्या माध्यमातून अनेक जण समतेची फळे चाखत आहेत.राज्यघटनेतच त्यांनी समानतेचा पाया रचला. भारतीय राज्यघटना जी आहे त्यात प्रारंभी असलेली प्रास्ताविका बरंच काही सांगून जाते. या प्रास्ताविकेमध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय,बंधुता ही मूल्य तर आहेतच त्याचबरोबर या उद्देशिकेमध्ये अखिल मानव कल्याणाचा, त्यांच्या उत्कर्षाचा कल्याणकारी मार्ग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, परिश्रम केले. यासाठी त्यानी खूप वाचन केले,अनेक संदर्भ ग्रंथ शोधले आणि त्या सखोल ज्ञानातून आणि अनुभवातून भारतीयांना त्यांचे मूलभूत हक्क प्रदान करण्याचं काम त्यानी केलं. जे मूलभूत हक्क दिले आहेत,त्यामध्ये समानतेचा स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक हक्क आहे. संविधानिक उपाययोजनाचा हक्क आहे. असे महत्त्वाचे कितीतरी हक्क घटनेच्या माध्यमातून दिले म्हणून ते सामाजिक समतेचे पुरस्कर्ते आहेत. घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका विशिष्ट धर्मापुरते किंवा जातीपुरते मर्यादित काम केले नाही तर सबंध भारतीयांसाठी काम केले. त्यांचा दृष्टिकोन सामाजिक न्यायाचा, सामाजिक सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा होता. १९४६ ते १९५० पर्यंत संविधानिक सभेत ते कार्यरत असताना आणि ते राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी राज्यघटना तयार करताना त्यात त्यांनी सर्वांना समान मूलभूत हक्क बहाल केले. समस्त मागासवर्गीयांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसाठी सरकारची जबाबदारी निश्चित करणारी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली. यासोबतच अनेक सामाजिक हिताच्या, त्यांच्या उत्कर्षांच्या,त्यांच्या कल्याणाच्या वेगवेगळ्या तरतुदी राज्यघटनेमध्ये केल्या. त्यामुळेच आज या देशातील अनुसूचित जाती- जमाती इतर मागासवर्ग स्त्रिया, लहान मुले, समस्त वंचित घटक जो दुर्लक्षित समूह आहे ते आज सुरक्षित व सन्मानाचे जीवन जगत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लहानपणी व आपल्या जीवनामध्ये अनेकदा हाल, अपेष्टा सहन केल्या. जातीयतेचा सामना केला. स्पृश्य -अस्पृश्य भेदाभेद याचा सामना केला परिणामी, त्यांनी समतेसाठी या संघर्षामुळेच प्रयत्न केले. त्यांनी या देशाची लोकशाही भक्कम करण्यासाठी, राज्यघटनेमध्ये सर्वांच्या उत्कर्षाची, सर्वांच्या उद्धारांची कवचकुंडले दिली.
राज्यघटनेच्या माध्यमातून समता,स्वातंत्र्य,न्याय आणि बंधुता ही मूल्य एका विशिष्ट वर्गापुरती नाही तर ती सबंध भारतीयांसाठी त्यांनी दिलेली आहेत, म्हणून ते खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते ठरतात.
त्यांना नेहमी वाटायचं की स्त्री-पुरुष, गरीब- श्रीमंत, कनिष्ठ-वरिष्ठ, शिक्षित -अशिक्षित अशा प्रत्येक व्यक्तीला समान हक्क, समान संधी, स्वातंत्र्य मिळाले पाहिजे व त्यांच्यासाठी सामाजिक न्यायाची व्यवस्था आणणे ही अपेक्षा लोकशाहीतच पूर्ण होऊ शकते अशी त्यांची धारणा होती. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विरोध करणाऱ्या सर्वंकष राज्यपद्धतीला त्यांचा कायम विरोध होता.अधिकाराचा लाभ समाजातल्या सर्व घटकांना, सर्व जाती-धर्माच्या लोकांना मिळाला पाहिजे.अल्पसंख्याकांना संरक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न होता आणि या सर्व तरतुदी त्यांनी संविधानात केल्या. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी महान कार्य केले. स्त्रियांना समानतेच्या सूत्रामध्ये बांधण्याचे काम सुद्धा त्यांनी केलं. १९ व्या शतकामध्ये देशांमध्ये स्त्रियांची परिस्थिती हलकीची होती. भारतातील स्त्री पूर्णतः रूढी, परंपरा,आचार -विचार चाली-रीती, धर्मबंधने यामध्ये अडकलेली होती, दबलेली होती.तिला सुद्धा बंधनमुक्त करण्याचे काम डॉ.आंबेडकर यांनी केले.
महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे प्रसंगी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ज्ञान आणि विद्या या दोन गोष्टी पुरुषांसाठीच नाही तर त्या स्त्रियांना तेवढ्याच आवश्यक आहेत. पुढील पिढी सुधारण्यासाठी मुलींना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका. ज्यावरून जात ओळखली जाते असे राहणीमान बदला. दारुड्या नवऱ्याला, मुलाला, भावाला घरात जेवायला वाढू नका. मुलींना शिक्षण द्या.त्यांचे महाड येथील भाषण इतके क्रांतिकारी होते की, महिलांना त्यांच्या भाषणातून प्रेरणा मिळाली आणि आपण स्वावलंबी स्वाभिमानी बनले पाहिजे असा तिथल्या प्रत्येक महिलांना साक्षात्कार झाला व त्यामुळे अनेक महिला शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. त्यांच्या स्त्रीविषयक विचारावर लक्ष केंद्रित केल्यास त्यांच्या विचारातून सर्व जातीतील स्त्रियांच्या कुटुंबाची स्थिती व प्रतिष्ठा या बाबतीत बाबासाहेबांनी बारकाईने निरीक्षण चिंतन व मनन केल्याचे दिसते. त्यानी भारतीय स्त्रीला गुलामगिरीतून मुक्त केले यातूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार दृष्टीपथास येतो.
ते नेहमी म्हणायची की, आज सगळ्यात महत्त्वाची जी गरज आहे ती आपल्या लोकांमध्ये समान राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे. लोकांमध्ये मी प्रथम भारतीय नंतर हिंदू,मुस्लिम,शीख, सिंधी,गुजराती कर्नाटकी अशी भावना निर्माण होण्याऐवजी मी प्रथम भारतीयच आहे, अशी समान राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे, असे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. त्यानी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये भारतीय समाजजीवनाचा विचार केला. त्यांचे जीवन म्हणजे शोषणमुक्त, समतामुलक समाजक्रांतीचा खऱ्या अर्थाने एक रणसंग्राम आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांचे व्यक्तिमत्व हे अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते. कारण त्याना जातीयतेचे चटके वेळोवेळी सहन करावे लागले. त्यांना जातीप्रथेचे निर्मूलन व्हावे, असे अनेकदा वाटायचे. त्यासाठी त्यांनी 'अनहीलेशन ऑफ कास्ट' हा ग्रंथ लिहिला. त्यानी जातिव्यवस्थेच्या संदर्भात अनेकदा आपल्या भाषणात जातीव्यवस्था सामाजिक एकोपाला धोका असल्याचे सांगितले. म्हणूनच त्यांनी समतेवर आधारित विवेकील समाज घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या संघर्षामुळेच आज या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान शिक्षण, समान हक्क, समान न्याय, समान स्वातंत्र्य,समान बंधुता मिळते आहे. संविधानातील कलम ३४० ३४१,३४२ अंतर्गत त्यांनी या देशातल्या ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीं व इतर मागासवर्गीयसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत.व त्यांना समानतेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
एकंदरितच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समानतेच्या दृष्टीने अत्यंत मौलिक आहे.
म्हणून ते खऱ्या अर्थाने समतेचे जनक होत.
डॉ.बबन जोगदंड
विभागप्रमुख, बार्टी,पुणे
9823338266
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा